
मराठीच्या मुद्यावर नेहमी आक्रमक भूमिका घेत खळ्ळखट्याक करणाऱ्या मनसेने अमराठी रिक्षा चालकांसाठी मराठीची शिकवणी सुरू केली आहे. परिवहन विभागाने एक मे पासून मराठी भाषेबाबतच्या नियमाची सक्तीने अंमलबजावणी करणार असल्याचे संकेत दिले आहेत. मराठी भाषेत संवाद साधणे, लिहिता-वाचता येत नसल्यास त्यांचे परमिट रद्द करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर मीरा-भाईंदरमध्ये मनसे मराठीचे शिकवणीचे वर्ग सुरू केले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नेहमीच मराठी भाषेच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र, आता मीरा-भाईंदरमध्ये मनसेने एक विधायक पाऊल उचलले असून शहरात रिक्षा चालवणाऱ्या परप्रांतीय चालकांसाठी ‘मोफत मराठी शिकवणी’ उपक्रम सुरू केला आहे. आज, १९ एप्रिल २०२६ रोजी मीरा रोड येथे या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
मनसेचे शहर अध्यक्ष संदीप राणे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात येत आहे. मीरा-भाईंदर शहरात मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीय आणि इतर प्रांतांतील रिक्षाचालक कार्यरत आहेत. अनेकदा भाषेच्या अडचणीमुळे प्रवासी आणि चालक यांच्यात वादाचे प्रसंग उद्भवतात. हे टाळण्यासाठी आणि मराठी भाषेचा प्रसार करण्यासाठी मनसेने ही पाटी हाती घेतली आहे. या उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी सुमारे १०० ते १५० रिक्षाचालकांनी स्वखुशीने आपला सहभाग नोंदवला.
